डॉ.
नरेंद्र कृष्णराव करमरकर- डॉ. नरेंद्र करमरकर यांचे शालेय
शिक्षण पुणे येथील भावे
हायस्कुलमध्ये झाले. शालांत परीक्षेनंतर ह्यांनी पुण्याच्या एम.ई.एस.
कॉलेजमध्ये (सध्याचे गरवारे महाविद्यालय) प्रवेश घेतला. १२वीला त्यांना
राष्ट्रीय प्रज्ञा शोध (एन.टी.एस) शिष्यवृत्ती मिळाली. येथूनच त्यांच्या
उत्तुंग भवितव्याची वाटचाल सुरु झाली. १९७३ साली आय.आय.टी.च्या एन्ट्रन्स
परीक्षेस बसून सर्व भारतात प्रथम आले. १९७८साली आय.आय.टी. पवई येथून ते
बी.टेक. झाले. बी.टेक. परीक्षेस त्यांना सुवर्णपदक मिळाले. इंडियन
फाउन्डेशनतर्फे शिष्यवृत्ती मिळवून डॉ.नरेंद्र करमरकर नंतर अमेरिकेला
गेले. अमेरिकेमध्ये त्यांना कॅल्टेक(कॅलिफोर्निया इन्टिट्युट ऑफ
टेन्कॉलॉजी)मध्ये टीचिंग असिस्टंटशीप मिळाली व तेथूनच त्यांनी एम.एस.ही
पदवी संपादन केली व पुढे कॉम्प्युटर सायन्समध्ये पी.एच.डी. ही श्रेष्ठ
पदवी संपादन केली.
बर्कले विद्यापीठाच्या बेल प्रयोगशाळेत संशोधन
करुन १९८५मध्ये त्यांनी जगातील जटील प्रश्नांची उत्तरे थोड्या वेळात अचूक
शोधून काढण्याची पध्दत वयाच्या
२८ व्या वर्षी शोधून काढली व याच शोधाबद्दल जगांत त्यांचे सर्वत्र अभिनंदन
झाले. न्युटन, आर्किमिडीज यांच्याप्रमाणे करमरकर लॉमुळे डॉ.नरेंद्र यांचे
नांव अजरामर झाले. त्यांनी किचकट आकडेवारीची अवघड समीकरणे सोडविण्याची नवी
क्रांतीकारी गणित पध्दत शोधून काढली. हा शोध उपायोजित गणितं
(अप्लाईड मॅथेमॅटिक्स) या शाखेतील आहे. गणित व संख्याशास्त्र यांच्या
सीमारेषेवर असणार्या रेषीय आखणी (लिनीअर प्रोग्रॅमींग) या शाखेतील आहे.
प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रात उत्पादन व वितरण शाखेमध्ये ज्या गणिताचा
उपयोग केला जातो ती ही गणिताची शाखा.
अंकगणिताच्या अगणित आकडेमोडी संगणक पटापट करु शकतो हे आपल्याला ठाऊक आहे.
पण संगणक तसा सांगकाम्याचं ! त्याला सारे कांही ओळीने सांगावे लागते.
प्रश्न असा की, जिथे हजारो प्रश्नांची गुंतागुंत झाली आहे असे प्रश्न
संगणकामार्फत सोडवून घेता येतील काय ?
करमरकरांनी नेमकी हीच किमया केली. प्रचंड गुंतागुंत
असलेले प्रश्न सोडविता येतील अशी पूर्वीपेक्षा जलद व विश्वासार्ह पध्दत
त्यांनी शोधून काढली. या करमरकर पध्दतीमुळे यांत आता सोपेपणा येणार आहे.
शिवाय संगणकाचा कमी उपयोग करावा लागणार आहे. फार जटील असल्याने सिंप्लेक्स
पध्दतीने जे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्नच आजपर्यंत सोडून दिला जात असे.
असे अनेक मोठमोठे प्रश्न आता सोडविता येणार आहेत. जुन्या(सिंप्लेक्स)
पध्दतीसाठी खास केलेल्या प्रोग्रॅमद्वारे हे प्रश्न सोडविण्यास जेवढा वेळ
लागत असे त्याच्या केवळ एक पन्नासांश इतक्या कमी वेळात करमरकर यांच्या
पध्दतीवर आधारित प्रोग्रॅमचा वापर करून उत्तरे मिळू शकली. मोठमोठ्या
गणकयंत्राच्या एक सेकंद वेळाची किंमत हजारो डॉलर्स होते. यावरून या शोधाचे
महत्व लक्षात येते. सबंध जगातील गणिततज्ञाचे लक्ष वेधून घेणारा हा
क्रांतिकारी शोध आहे. डॉ.नरेंद्र करमरकर यांच्या संशोधनाला न्यूयार्कमधील
सर्वच वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर ठळक प्रसिध्दी दिली होती.
त्यावेळी अमेरिकेत कुठूनही कुठेही चटकन कमीत कमी
खर्चात फोन करता येईल आणि हे ही टेलिफोनच्या तारांमध्ये सर्वात कमीत कमी
गुंतागुंत होईल अशा पध्दतीने, अशा यंत्रणेचा आराखडा त्यांनी तयार केला.
अमेरिकन एअरलाईन्सच्या सहकार्याने कोणत्याही दोन शहरांमध्ये विमानसेवा
सर्वात अधिक सोयीची आणि कमी खर्चाची होईल हे ही त्यांनी दाखविले. अशा
प्रश्नांच्या उत्तरात खूपच असतात. त्यातील सर्वात कार्यक्षम यंत्रणा
निवडल्यामुळे अब्जावधी रुपयांचे इंधन, वीज, मनुष्यतास अशा कित्येक
गोष्टींची बचत होते. गणकयंत्राशी संबंधित असलेल्या गणित विज्ञानाला नव्या
संशोधनामुळे नवीन वळण लागले आहे अशा शब्दात बेल प्रयोग शाळेचे संचालक
डॉ.रोनाल्ड एल. ग्रॅहॅम यांनी डॉ.नरेंद्र करमरकरांचा गौरव केला.
डॉ.नरेंद्र
करमरकर आता मुंबईतील टाटा मुलभूत संशोधन शाखेत दाखल झाले आहेत.
भारतापुढेही अशाच प्रकारच्या कित्येक समस्या आहेत. त्यावर सर्वोत्कृष्ट
तोडगे काढण्यावर अब्जावधी रुपयांची बचत अवलंबून आहे. भारतासारख्या
विकासाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या देशाला या तोडग्यांची नितांत गरज
असल्याने करमरकरांच्या संशोधनाला फारच महत्त्व आहे. सर्व भारतीयांना
विषेशत: करमरकर कुटुंबीयांना सार्थ अभिमान वाटावा असेच हे गौरवास्पद कार्य
आहे. आता गणिताच्या विश्वामध्ये आपल्याच आडनावाने संबोधली जाणारी एक
सर्वमान्य अशी ही बाब निश्चितच आपल्याला प्रेरणादायी ठरेल.